रत्नागिरी : जिल्हयातील बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या जोडीला आता नाटेतील जनता असणार आहे. नाटे पंचक्रोशी विरोधी संघटना स्थापन झाली असून पुढील काळात बारसू सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना व नाटे पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाटे पंचक्रोशी संघटनेने दिली. नाटे पंचक्रोशीतील संघटनेत साखरी नाटे, नाटे, राजवाडी, आंबोळगड, मोगरे आदी गावांतील ग्रामस्थांचा समावेश आहे. पंचक्रोशीत प्रस्तावित असणाऱ्या रिफायनरी संबंधातील क्रूड ऑइल टर्मिनल, बंदर, सिंगल पॉईंट मुरिंग आदी प्रकल्पांमुळे परिसरात मासेमारी प्रतिबंधक क्षेत्र, समुद्रावरील हक्कच गमावणे, तेल गळतीमुळे समुद्र व किनारे प्रदूषित होऊन समुद्री जीव, मासे यांचेवर गंभीर परिणाम, आंबोळगड वाडा तिवरे किनाऱ्याची पर्यटन क्षमता संपणे, क्रूड ऑईलच्या टाक्यांचा कायम अपघाताचा धोका आदी कारणांमुळे येथील पंचक्रोशीतील जनता विरोध करत आहे. येत्या काही दिवसांत रिफायनरी विरोधक संघटना कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.