रत्नागिरी : मच्छीमारी नौका समुद्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील मच्छी व्यवसायिक दुय्यम दर्जाची मासळी बैगलोर, मुंबई, गोवा, इत्यादी ठिकाणी पाठवित असतात. मासळी निर्यात करणाऱ्या गाड्यामुळे दुचाकीस्वरांना अपघातास आमंत्रण मिळत असल्याचे पाहायला मिळते. मासळी खराब होऊ नये यासाठी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये बर्फ ठेवला जातो. या बर्फाचे पाणी साठविण्यासाठी गाडीच्या एका बाजूला टँक ठेवून त्यामध्ये पाणी साठविले जाते. मात्र रत्नागिरीतील अनेक मासळीची वाहतूक करणारे वाहनचालक गाडीला टँक न लावता गाडीतील मच्छीचे पाणी पाईपद्वारे रस्त्यावर सोडतात. रस्त्यावर सोडत असलेल्या मच्छीच्या पाण्यावरून अनेक दुचाकीस्वरांचे घसरुन अपघात होत असतात. दरम्यान या मच्छी वाहतूकदारांच्या मनमानी कारभारामुळेच साळवी स्टॉप येथे मच्छीच्या पाण्यावरून सुमारे १० ते १२ वाहने घसरून अपघात घडल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास घडली. या मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यातून त्रास दुचाकीस्वारांना होत असल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर साळवी स्टॉप येथे भंगार व्यावसायिकांच्या समोर हा अपघात घडला. रस्त्यावर सांडलेल्या पाण्यावरून ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत धडाधड दुचाकी पडण्याच्या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. अखेर पाणी सांडलेल्या भागात आडवे दगड टाकून हा रस्ता बंद करण्यात आला. यामुळे पुढील अपघात टळले.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथून फिशमिल तसेच इतर मासळी भरून गाड्या एमआयडीसी येथील कंपनीत येत असतात. या गाड्यांमधून रस्त्यावर सांडणारे पाणी नेहमीच अपघाता कारणीभूत ठरत असते. या अपघातांच्या मालिकांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर अनेकजण जखमी झालेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर येथूनच जवळ असलेल्या चंपक मैदानावर रत्नागिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार असल्याने महोत्सवाला मोठी गर्दी होती. त्यामुळे कुटुंबासह महोत्सवात येणाऱ्यांची मोठी गर्दी होती. सुदैवाने अपघातांच्या मालिकांमुळे जीवीत हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या मार्गावर नियमित मासळी वाहतूक होत असते. या मासळी वाहतूकीमुळे रस्त्यावर पाणी सांडण्याचे प्रकार नियमित होतात. त्यामुळे असे अपघात घडत असतात. मात्र संबंधित यंत्रणा या बाबतीत नेहमीच उदासीन दीसून आली आहे. अपघातांच्या या प्रकारामुळे स्थानिक तरुणांनी मासळी वाहतूक रोखण्याचे काम केले होते. थोडे दिवस ही वाहतूक सुरक्षित उपाय योजना करून करण्यात येते मात्र कालांतराने पून्हा असुरक्षित वाहतूक सुरू होऊन अपघातांची मालिका सुरू होते. संबंधित यंत्रणेने या प्रकरणी कायमची उपाय योजना करून वाहनधारकांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी होत आहे.