संगमेश्वरः संगमेश्वर तालुक्यात गेले अनेक दिवस चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. मुरंबाड, सरंद, धामापूर तर्फे संगमेश्वर अशा ठिकाणी 25 ऑक्टोबर रोजी एकाच रात्री चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. रत्नागिरी येथून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांनी चोरी झालेल्या मंदिरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. परंतु चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान आहे. सीसीटिव्ही मध्ये 3 दिसत आहेत. एका मंदिरात जाण्यापूर्वी 2 चोरटे मंदिराच्या बाहेर चर्चा करताना दिसत आहेत. त्यातील एक उंच आणि मजबूत बांध्याचा असून दुसरा उंचीने कमी आहे. तर तिसऱ्या सीसीटिव्ही फुटेज उंच पुरा असून त्याने अंगावर काळ्या रंगाचा जर्किन परिधान केला आहे. तो मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. मंदिरातील दानपेटी 'उचलून तो बाहेर घेऊन जाताना दिसत आहे.
सीसीटिव्ही फुटेजवरून हे चोरटे माहितगार असल्याचे दिसत आहे. पोलिस आता त्या दृष्टीने तपास करत आहेत. लवकरच चोरटे पोलिसांच्या ताब्यात असतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.