बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये या महिन्यात अतिरिक्त पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे खरिप पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह इतर पिके उध्वस्त झाली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही मदत घोषीत केली नाही. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाले असून या नुकसानासाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. दिवाळी झाल्यानंतरही शासनाने शेतकर्‍यांना मदत दिली नाही. मदत नेमकी कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दरवर्षी शेतकर्‍यांना कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावे लागते. गेल्या तीन वर्षापासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अतिरिक्त पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षीही महाराष्ट्रात हजारो हेक्टर क्षेत्रात पिकांची नासाडी झाली होती. यावर्षीही पिकाचे नुकसान झाले. या महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. सोयाबीन, कापूस हे दोन्ही प्रमुख पिके खराब झाली. या दोन्ही पिकावर शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र पावसाने जाता जाता घात केला. अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार पंचनामे झाले असले तरी शेतकर्‍यांची दिवाळी मात्र गोड ऐवजी कडू झाली. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाली असल्याची नोंद करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. आता ही मदत नेमकी कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना विविध आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनाची अद्यापपर्यंत पुर्तता करण्यात आली नाही. मदत घोषीत झाली तरी ती किती होईल? हे ही नक्की सांगता येत नाही.