रत्नागिरी : परतीच्या पावसाने भात पिकांचे नुकसान झाले असताना त्याची पाहणी आणि पंचनामे तातडीने करण्यासाठी तसेच नुकसान भपाईची प्रक्रियाही जलदगतीने राबविण्यासाठी कोकणातील कृषी हानीची पाहणी उपग्रहाद्वारे करण्यात येणार आहे. प्रायोगीक तत्वावर हा प्रयोग कोकणातील जिल्ह्यात करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती येथील कृषी विभागातील सुत्रांनी दिली.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात परतीच्या पावसाचा जोर होता. या कालावधीत कोकणात खरीपीचा कापणीचा हंगाम सुरू झाला. मात्र परतीच्या पावासामुळे अनेक भागात कापणी न होताच पीक शेतातच पावसाने आडवे झाले. काही भागात पुन्हा मोड आले. त्यामुळे कापणी न होताच भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीच्या सणामध्ये मोठे संकट ओढवले आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांनी दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.