चिपळूण : जनतेच्या हक्काचे आरोग्यपीठ असणाऱ्या अपरांत हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांकरिता डायलिसिस म्हणजे जीवन- मृत्यूमधील दुवा असून, रुग्णांना ही वैद्यकीय प्रक्रिया त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांना वारंवार करून घ्यावी लागते. अशा सर्व रुग्णांसाठी ही मोफत सुविधा हा एक अत्यंत मोठा आर्थिक दिलासा आहे.
डायबेटीस, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, जंतुसंसर्ग अशा आजारांच्या रुग्णामध्ये किडनी फेल होऊन क्रियाटिनिन व युरियाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, अशा वेळी अशा रुग्णांसाठी पेरीटोनियल डायलिसिस व हिमो डायलिसिस सेवा अपरांतमध्ये उपलब्ध आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना चारकोल डायलेसिस, जी. बी. सिंड्रोम सारख्या दुर्मिळ व असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी प्लास्मा फेरेसिस या अत्यंत गरजेच्या व महत्वाच्या high end उपचार प्रक्रिया देखिल या विभागामध्ये उपलब्ध आहेत. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता अनुभवी व कुशल नर्सिंग स्टाफ, हिपॅटायटीस बी पॉझिटीव्ह असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र डायलीसिस सेवा, अतिदक्षता विभागामध्ये आपत्कालीन रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा, डायलिसिसच्या रुग्णांसाठी प्रत्येक महिन्यामध्ये निष्णात नेफ्रोलॉजिस्ट यांचे समुपदेशन व सल्ला, अद्ययावत मशिन्स उपलब्ध आहे.