रत्नागिरी : सध्या रस्त्याच्या शेजारी गुपचूपपणे कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः शहरालगत हे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याची सुरुवात विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून होणार आहे. याठिकाणी पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार असून संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विमानतळाकडे जाणारा रस्ता स्वच्छतेसाठी कराव्या लागणाऱ्या उपायोजनांवर चर्चा झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांच्यासह नगरपालिका, शिरगाव व मिरजोळे ग्रामपंचायत, कोस्टगार्ड, पोलिस, प्रदुषण विभाग एमआयडीसी, स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ वाहतूकीसाठी खुले केल्यानंतर रत्नागिरीतील विमानतळावरुन वाहतूक सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर बैठकाही सुरु आहेत. विमानतळाकडे जाणारा रस्त्यावर पाच ठिकाणी कचरा टाकून ठेवला जातो. त्यात प्लास्टीक कचऱ्यासह हॉटेल, दुकानदारांकडील कचरा साचलेला असतो. त्या कचऱ्यामुळे तेथे पक्षी, प्राण्यांचे वास्तव्य असते. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने कचरा टाकण्यावर कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. नगरपालिका व ग्रामपंचायतीने परिसरातील दुकानदार, मटण विकणारे, टपरीवाले, भाजी व्यावसायीक यांच्यासह नागरिकांना सुचना दिल्या जाणार आहेत. कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. कचरा रात्रीच्यावेळी टाकला जात असल्याने ग्रामपंचायत व पोलिस यांची गस्त घालण्यात येणार आहे. कचऱ्यामुळे भविष्यात कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी या उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 दरम्यान, गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शिरगाव आणि मिरजोळे ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. एमआयडीसीतील मोकळ्या जागेत असा प्लांट सुरु करण्यासंदर्भातही प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करण्याच्या सुचनाही सीईओंनी दिल्या आहेत.