संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला डुक्कर समजून तीची शिकार करणाऱ्या दोन शिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली विनापरवाना बंदूक आणि काडतुसे संगमेश्वर पोलिसांनी जप्त केली आहेत. मिलिंद महादेव चरकरी, निनाद धोंडु घाणेकर (दोन्ही रा. नरबे करबुडे, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद नरेंद्र रघुनाथ देसाई यांनी पोलिस स्थानकात दिली.

संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र रघुनाथ देसाई ( रा . मांजरे देसाईवाडी) यांनी आपल्या मालकीची म्हैस रानात चरण्याकरीता सोडली होती. मात्र सायंकाळ पर्यंत म्हैस घरी परत आली नसल्याने देसाई यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा.चे सुमारास ही म्हैस दिसून आली. यावेळी म्हशीची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. म्हैशीच्या पुढील डाव्या पायावर बंदुकी 6 गोळ्या झाडून तीला जखमी करून विकलांग केले होते. म्हशीवर उपचार करण्यात येत आहेत.

नरेंद्र देसाई यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चौकशी दरम्यान मिलिंद चरकरी व निनाद घाणेकर (दोन्ही रा. नरबे करबुडे ता. जि. रत्नागिरी) यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी डुक्कर समजुन म्हैशीची शिकार केल्याचे कबूल केले. पोलिसांनी निनाद घाणेकर त्याचे ताब्यातील विनापरवाना बंदुक आणि काडतुसे जप्त केली आहेत.

 संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे, पोलिस अंमलदार संतोष झापडेकर, किशोर ज्योयशी, सचिन कामेरकर, म्हसकर, शिंदे, आव्हाड यांनी कामगिरी केली.