रत्नागिरी : तब्बल दोन वर्षे कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजविला होता. कोरोना काळात सर्वांनाच आर्थिक तोटा सहन करावा लागला. कोकण रेल्वेलाही हे नुकसान झाले आहे. कमी प्रवाशांमुळे १३५ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने दोन्ही आर्थिक वर्षात २३५, १४५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असून त्याची परतफेड करायची आहे. 

सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा सर्व गाड्या पूर्ण क्षमतेने धावत असल्याने हे कर्ज लवकरच फेडू, असे कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. रेल्वे वाहतुकीत कोकण रेल्वेचा पट्टा सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. अशातच मार्च महिन्यात कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नवीन स्थानकांच्या उभारणीचे कामही पूर्ण झालं आहे.

रेल्वेने घेतले ३८० कोटींचे कर्ज नवीन रेल्वे गाड्याही मार्गावर धावत आहेत. मध्य रेल्वेच्यावतीने कोकण रेल्वेमार्गावर ३२ ट्रेन मिळाल्या आहेत तर प्रतिदिन २० ते ३० गाड्या विद्युतीकरणावर धावत आहेत. यामुळे प्रशासनाचे उत्पन्न वाढले आहे. येणाऱ्या काळात अधिकचे उत्पन्न मिळवत रेल्वे मंत्रालयाचे ३८० कोटींची आर्थिक मदत परतफेड करून अनेक नवनवीन सुविधा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहे.