रत्नागिरी : दोन वर्षे असलेले कोरोना संकट थोडे दूर झाले असून, नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांतच पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळे, गुहागर, दापोली याठिकाणी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊनपासून दोन वर्षे पर्यटनावर निबंध होते. दिवाळीची सुट्टी सुरू आहे. भाऊबीज, पाडवा बुधवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाडवा झाल्यानंतर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. कोकणचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असल्याने परजिल्ह्यातील तसेच दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पर्यटकांचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे गर्दीने फुलणार आहेत.
जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, आरेवारे, पावस अशा ठिकाणी पर्यटक भेट देतात. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक घेतात. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. तर काही पर्यटक मात्र निवासासाठी थांबतात. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी शहरातील भाट्ये , मांडवी किनाऱ्यावरही स्थानिकाबरोबर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
व्यवसायिकांना मिळणार उभारी
पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हिवाळी पर्यटनासाठी विदेशातील पर्यटक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा राजवाडा आदी प्रमुख स्थळांचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. याठिकाणी पर्यटक भेट देतात.