राजापूर : नगर परिषद प्रशासनाने प्लास्टीक बंदी आदेशाची अंमलबजावणी करताना प्लॉस्टीक पिशीव्या वापराबाबत राजापुरात काही व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाई बाबत शहरातील व्यापारी व प्रथमेश ट्रेडींगचे मालक विलास पेडणेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.याबाबत योग्य तो खुलासा आणि मार्गदर्शन करावे व व्यापाऱ्यांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी पेडणेकर यांनी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांचेकडे केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन पेडणेकर यांनी उपप्रादेशिक अधिकारी यांना मंगळवारी दिले आहे. 

प्लॅस्टीक वापर बंदीबाबत महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्माकॉल बंदी आदेश २०१८ नुसार महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य पॅकींगसाठी किराणा रिटेल व होलसेल रिपॅकींग करण्यासाठी दुकानामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली होती. परंतु केंद्र सरकारच्या सन २०२१ च्या प्लॅस्टीक बंदी नियमानुसार प्लॅस्टीक पिशव्यांसाठी ७५ मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या व डिसेंबर नंतर १२० मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्या वापराबाबत नमूद केले आहे.

मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषद हद्दीमध्ये ७५ मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीच्या अन्नधान्य पॅकींगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टीक पॅकींग पिशव्या विना हॅन्डेल साठी सक्ती करण्यात येत आहे व महाराष्ट्र प्लॅस्टीक बंदी कायद्यानुसार अन्नधान्यासाठी परवानगी असलेल्या ५० मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टीक पॅकींग पिशव्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रम निर्माण होऊन गोंधळाचे वातावरण झाले आहे.