औरंगाबाद: औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, दिवाळीत फटाके वाजवण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या एकट्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मारहाणप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
फटाके फोडताना 16 जणांना इजा
औरंगाबाद जिल्ह्यात कालपासून वेगवेगळ्या घटनेत फटाके फोडताना 16 जणांना इजा झाली आहे. तर 6 रुग्णांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ज्यात एका शहरातील मिसरवाडी भागातील 10 वर्षाच्या मुलाच्या चेहरा आणि डोळ्याला फटाके फोडताना इजा झाली आहे. त्याच्यावरही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.