रत्नागिरी : दरवर्षी दिवाळीचा आनंद आपण आपल्या कुटुंबिय, नातेवाइकांसोबत द्विगुणित करतो. परंतु समाजातील वंचित, दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी काही करावे या हेतूने फाटक हायस्कूलच्या १९८६ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्मृतीगंध ८६ या ग्रुपने गाडीतळ येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत केली. एकूण २६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यामध्ये २१ हजार रुपये गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून दिले आहेत. तर पाच हजार रुपयांचा खाऊ विद्यार्थ्यांसाठी दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले व त्यांची दिवाळी गोड झाली.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
स्मृतीगंध ८६ ग्रुपतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले हे माजी विद्यार्थी समाजात सकारात्मक कार्यक्रमांसाठी प्रयत्नशील असतात. मूकबधिर विद्यालयात दीपावलीनिमित्त प्रदर्शन सुरू झाल्याची बातमी वाचनात आल्यानंतर या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत करावी, असे ग्रुप सदस्यांना सुचले आणि त्यांनी तसा मेसेज त्यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर पाठवला. याला चांगला प्रतिसाद मिळाला व प्रत्येकाने आपल्याला शक्य असणारी रक्कम तत्काळ गोळा केली आणि शाळेत प्रदर्शन सुरू असताना शनिवारी २२ ऑक्टोबरला वितरित केली.
याप्रसंगी स्मृतीगंध ग्रुपचे ग्रुपचे संस्थापक सचिन वहाळकर, ग्रुप अॅडमिन अरुण कीर, सदानंद कांबळे, वैशाली जोशी, स्वाती घगवे, नंदा होतेकर, पराग सुर्वे, सोमनाथ रुणकर, महेश पोटफोड आणि या ग्रुपच्या सदस्य तथा या विद्यालयाच्या व्यवस्थापिका पद्मजा आठल्ये आदी उपस्थित होते. शाळेत काही विद्यार्थी दूरवरून येतात, त्यांच्या काही शैक्षणिक अडचणी पाहता त्यांच्याकरिता ग्रुपने २१ हजार रुपये सुपुर्द केले. तसेच खाऊसाठी ५ हजार रुपये असे २६ हजार रुपये मुख्याध्यापक गजानन रजपूत यांच्याकडे दिले. या वेळी शाळेत सुरू असलेल्या हस्तकला प्रदर्शनातील शोभिवंत वस्तू, मातीपासून बनवलेले मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, काष्ठशिल्प, लाकडांच्या तुकड्यांपासून बनवलेल्या गाड्या, खेळणी, कलात्मक वस्तू पाहून स्मृतीगंध ग्रुपचे सदस्य भारावून गेले. या वस्तू खूपच सुंदर आहेत. विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करताना आम्ही दिलेली मदत तुटपुंजी आहे, परंतु शाळेच्या गरजेनुसार यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही ग्रुपतर्फे देण्यात आली.
या वेळी मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सीमा मुळ्ये, रमेश घवाळी, उपासना गोसावी, राजकुमार कसबे, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड, साक्षी वासावे, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. तसेच आपण दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी असल्यामुळे यापुढेही मूकबधिर विद्यालयासही शक्य ती मदत करावी, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. रजपूत यांनी केले.