रत्नागिरी : विसहून कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याबाबत हालचाली सुरू केल्यामुळे दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कानाकोपर्‍यातील वाड्यावस्त्यांवरील मुलांना याचा फटका बसू शकतो. जिल्ह्यातील २ हजार ४४६ शाळांपैकी १ हजार ३४५ शाळा वीसहुन कमी पटाच्या आहेत. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळात समायोजन केल्यास त्यातील शिक्षकांचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कमी पटाच्या शाळांमध्ये सुमारे अडीच हजार शिक्षक आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णयाचा मोठा फटका रत्नागिरी सारख्या दुर्गम भागातील जिल्ह्याला बसणार आहे. कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील २८ शाळातील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. जिल्हापरिषदेच्या १ ते ८ वीच्या २ हजार ४४६ शाळांमध्ये ७२ हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. गुणवत्ता असली तरीही अनेक शाळांचा पटही कमी होत आहे. खासगी इग्रजी शाळांचे आव्हान जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपुढे निर्माण झाले आहे. शहरातील शाळांमध्ये पाल्याने शिक्षण घ्यावे अशी मानसिकता पालकांमध्ये आहे. त्यामुळे पट टिकवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनासह शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाच्या निकषानुसार एक ते साठ पटसंख्येला दोन शिक्षक आहेत. यामुळे जवळपास अडीच हजार शिक्षक या शांळामध्ये शिकवत आहेत. या शिक्षकांचे समायोजन किंवा त्यांचे पुढे काय करणार याबाबत संभ्रमावस्था आहे. ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवायचे असेल तर हा निर्णय तातडीने मागे घेणे गरजेचे आहे. शाळा दुरवर असल्याने अतिदुर्गम भागातील पालक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवण्याची भिती आहे. त्यामुळे गळतीचे प्रमाण वाढेल आणि मुलींचे शिक्षण बंद होईल. ग्रामीण महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. शाळा घरापासून लांब गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे. शिक्षकांची रिक्त पदे अधिक असल्याने जिल्ह्यातून बाहेर जाण्याची भिती नसली तरीही शिक्षकांना एका तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात जावे लागू शकते.