चिपळूण : शहरामधील पानगल्ली येथील गुटखा वितरक आनंद पुजारी याला पोलिसांनी गुरूवारी रात्री अटक केली. शुक्रवारी २१ रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या धडक कारवाईमुळे गुटखा साठा व वितरण करणाऱ्यांचे तसेच विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरात नुकतीच मुंबई व रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बाजारपेठेतील रुमानी चेंबर येथे सिद्धेश सचिन खेराडे याचा ३ लाख ४७९ रुपये तसेच रंगोबा साबळे मार्गावरील नजराणा अपार्टमेंट येथून शहनवाज मुस्ताक कच्छी, मुस्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी, समीर अयुब शेख याच्याकडील १ लाख ४७५ रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा साठा जप्त केला होता. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बेधडक कारवाईनंतर चिपळूण तालुक्यासह जिल्हयातील महत्वाच्या बाजारपेठेतील गुटखा विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते.

अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईनंतर व्यावसायिकांवर कोणताच परिणाम झालेला नसल्याने यातूनच मुस्ताक कच्छी यांना गुटखा पुरवठा करणाऱ्यांचा काही दिवसापासून पोलीस शोध सुरु होता. तपासातून आनंद पुजारी हा गुटखा पुरवठा करीत असल्याचे पुढे येताच पोलिसांनी आनंद पुजारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्याला गुरुवारी पोलिसांनी बाजारपेठेतून ताब्यात घेत त्याला अटक केली. आनंद पुजारी हा गुटखा किंग असून त्याला तालुक्यासह अन्य ठिकाणी अनेक वर्षापासून गुटखा वितरक म्हणून ओळखले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याने गुटखा कोठून आणला तसेच यामध्ये आणखी कितीजणांचा सहभाग आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रत्नदीप साळोखे करीत आहेत.