रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीमध्ये सुरू असलेल्या नोकरभरतीबाबत संशय व्यक्त होत आहे. ही भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप संचालक प्रदीप वाघोदे यांनी केला. अधिमंडळ सभेमध्येही या भरतीला सभासदांनी सर्वानुमते नोकर भरतीला कडाडून विरोध केला होता. वादग्रस्त भरती प्रक्रियेतील उमेदवारांचीच निवड करण्यात आल्याने याविरोधात प्रदीप वाघोदे यांच्यासह अनंत जाधव व महेंद्र साळगांवकर यांनी विरोधाचे पत्र दिले आहे. या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यासंदर्भात सहकारी संस्था उपनिबंधकांकडे ते दाद मागणार आहेत.पतपेढीच्या नोकर भरतीसंदर्भात याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. या भरतीसंदर्भात २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेतील विषय क्रमांक २ नुसार जो उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये नसतानाही त्याची निवड करण्याबाबत आग्रह एका विद्यमान संचालकांनी धरला होता. त्याच उमेदवाराची पुन्हा या वेळी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वाघोदे यांनी विरोध दर्शवला आहे. सभासदांच्या मताचा विचार न करता घाईघाईने संचालक मंडळाच्या ५ ऑक्टोबरच्या सभेमध्ये नोकरभरतीचा विषय प्रथम चर्चेसाठी आणला. २२ नोव्हेंबरच्या सभेपूर्वीच संबंधित उमेदवारांची निवडही करण्यात आली. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचे वाघोदे यांनी स्पष्ट केले. दुरुस्तीला सभासदांचा सर्वानुमते विरोध असतानादेखील मंडणगड शाखेच्या दुरुस्तीवर सुमारे २ लाख ५० हजार व रत्नागिरी शाखेच्या दुरुस्तीवर सुमारे १ लाख ५० हजार इतका खर्च झाल्याचे दिसत आहे. त्याला संचालकांनी विरोध दर्शवला आहे.
तर रस्त्यावर उतरणार...
विद्यमाने संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वी संपली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मिळालेल्या वाढीव मुदतीत बेकायदेशीर निर्णय व आर्थिक उधळपट्टी सुरूच असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला. प्रस्तावित नोकरभरती व शाखा दुरुस्तीचा प्रस्ताव स्थगित न केल्यास अध्यापक संघ रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.