रत्नागिरी : सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शांतता समिती आणि अन्य समित्यांच्या सदस्यांसोबत संवाद साधताना पहिल्या टप्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देणार आहे, असे रत्नागिरीचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची बदली झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. आज धनंजय कुलकर्णी रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. त्यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार धनंजय कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केला.