शिरुर: जांबूत (ता. शिरुर) येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सचिन जोरी आणि पूजा नरवडे यांच्या घटनेनंतर वनविभाग प्रशासनान मात्र खडबडून जागे झाले. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची मोठी फौज या भागात ठाण मांडून होती. यावेळी शनिवार (दि.२२) रोजी पहाटे मादी संवर्गातील 7 ते 8 वर्षे वयोमान असणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून पूजा नरवडेचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन अंदाजे 400 मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला.
पकडण्यात आलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात ठेवण्यासाठी परवानगी मिळाली. सदर ठिकाणी त्याची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. तसेच या भागातील बिबट हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता उर्वरित इतर बिबट्यांना देखील पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाचे प्रयत्न चालू आहेत. तसेच परिसरात इतरत्र बिबटे निदर्शनास आल्यास पिंजरे लावणार असल्याचे म्हसेकर यांनी सांगितले. या आधी देखील सचिन जोरी यांचा मृत्यू झाल्यानंतर या भागात पिंजरे लावण्यात आले होते. त्यावेळी जोरीमळा येथे एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले असून या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण वाढलेली आहे.
सध्या अनेक ऊसतोड मजूर या भागात ऊसतोडणीसाठी वास्तव्यास येत असून शेतांच्या कडेला त्यांचा संसार उघड्यावर असतो तसेच त्यांच्याकडे अनेक लहान बालके असतात त्यामुळे ऊस तोड मजुरांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे.
मागील 3 दिवसांपूर्वी जांबूत- वडनेर खुर्द रस्त्यावर सचिन जोरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळावर जांबूत येथून आठवडे बाजार करुन परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीवर देखील बिबट्याने हल्ला केला असून यामुळे शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला असल्याने 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात जरी वनविभागाला यश आले असले तरी इतर बिबट्यांची संख्या पाहता या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामू घोडे यांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, सिताराम म्हस्के यांचेसह वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी इतर बिबट्यांना देखील लवकर जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी करत या कारवाईमुळे वनविभागाचे आभार मानले.