रत्नागिरी : वेगवेगळ्या जातींच्या फणस लागवडीतून नवी कृषिक्रांती घडवू पाहणाऱ्या फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि त्यांचे सुपुत्र मिथिलेश यांनी चक्क फणसाची रोपे मॉरिशसला निर्यात केली आहेत. भारतातून प्रथमच फणस परदेशात चालला असून, ३०० रोपे घेऊन मॉरिशसमधील शेतकरी सोमवारी (दि. १७) रवाना झाले.

हरिश्चंद्र देसाई व मिथिलेश देसाई यांनी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून देशातून पहिल्यांदा परदेशात फणसाची रोपे पाठवली आहेत. गेली अनेक वर्षेपरदेशांतून फणसाची रोपे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र इथे आली जात होती. मात्र आता प्रथमच भारतातील रोपे परदेशात गेली आहेत.

मॉरिशसमधील उदेश या शेतकऱ्याने ३०० झाडे नेली. तेही फणसाची बागायती करणारे त्यांच्या देशातील पहिले शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत फणसाची रोपे देशभर पाठवत होतो. पण सोबत आता भविष्यात अनेक देश विदेशांमध्ये पाठवण्याचा मानस आहे. फणस शेतीमधून मोठी क्रांती घडू शकते. जगाची भूक १० टक्क्यांनी भागवेल, अशी क्षमता फणस लागवडीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही त्यावर अधिक भर देत आहोत. आता अन्य देशांमध्ये फणसाची रोपे पाठवण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे मिथिलेश देसाई ज्यांनी सांगितले. 

वर्षानुवर्षे कोकणात आंबा, काजू आणि त्यातल्या त्यात कोकम (रातांबा) वर प्रक्रिया केली जात आहे. त्यापासून अय उद्पादने घेतली जात आहेत. कोकणात फणसाचे उत्पादन चांगले असूनही त्याकडे व्यावसायिक पद्धतीने पाहिले जात नाही. हरिश्चंद्र देसाई आणि मिथिलेश देसाई यांनी गेली काही वर्षे मेहनतीने ही लागवड केली आहे आणि जोपासली आहे. त्यातून मोठा प्रक्रिया उद्योग उभारण्याला आणि त्यातून रोजगार निर्मितीला वाव आहे. आतापर्यंत दुर्लक्षित झालेल्या फणसाकडे देसाई यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.