चिपळूण : दिवाळीसाठी येथील बाजारपेठेत अनधिकृत दुकाने थाटणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. नगर पालिका प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी गुरुवारी या दुकानांवर धडक देत तेथून ती दुकाने हटविण्याची सूचना केली. विक्रेत्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर गुरुवारपासून प्रशासन ती दुकाने स्वतः हटवून माल जप्त करेल, असा इशाराही दिला. यामुळे फटाक्यांचे अनधिकृरीत्या स्टॉल उभारून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

चिपळूण शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी अगदी रस्त्यालगत या फटाका विक्रेत्यांनी आपली दुकाने उभारली आहेत. या दुकानांसाठी नगर पालिका अथवा संबंधित विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभी असलेली ही फटाक्यांची दुकाने अनधिकृत असल्याचे स्पष्ट होत आहे. नगर पालिकेचा यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा मानस आहे. माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ही मोहीम संपूर्ण शहरात राबविली जात आहे. फटाक्यातून मोठे प्रदूषण होत असल्याने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही नगर पालिका प्रशासनाने केले आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेत थाटण्यात आलेली अनेक फटाक्यांची दुकाने प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. बाजारपेठेतील या अनधिकृत फटाका स्टॉल्सची नगर पालिका व प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा स्टॉल्सधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, तहसिलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प. चे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधिक्षक अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार, अतिक्रमण विरोधी पथकाचे श्री. टोपरे, बापू साडविलकर, श्री. सावंत, मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार, तलाठी येडगे यांच्यासह पोलीस व नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी बाजारपेठेची पाहणी केली. तसेच संबंधित फटाका व्यावसायिकांना आपला माल व दुकाने हटविण्याची सूचना केली. दुकाने लावायची झाल्यास शहरातील पवन तलाव मैदान येथे पालिका प्रशासनाची परवानगी घेऊन आपल्या मालाची विक्री करावी, असेही सांगितले. सूचना करूनही स्वतःहून आपली दुकाने हटविली नाहीत, तर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.