रत्नागिरी : श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले धनंजय कुलकर्णी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण भानगाव आणि श्रीगोंदे येथे झाले. थोड्याशा कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असतानाही कुलकर्णी जिद्दीने कृषी पदवीधर झाले. नंतर "एमपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण होऊन 1998 मध्ये त्यांनी उपअधीक्षक म्हणून पोलिस खात्यातील सेवेस प्रारंभ केला. जळगाव येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. नंतर नागपूरच्या जंगल वॉरफेअर ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख आणि विशेष कृती दलाचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळे त्यांच्याकडे बृहन्मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेथील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणूनही काम केले. त्यांच्या कामाची पद्धत आणि झोकून देण्याची वृत्ती, गुन्ह्यांचा अभ्यास यामुळे त्यांच्यावर मुंबई पोलिस आयुक्तांचे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आली. ऑगस्ट 2014 पासून मे 2016 पर्यंत ते मुंबई पोलिस आयुक्तांचे प्रवक्ते आणि जनसंपर्क अधिकारी होते.
मुंबईतील गुन्ह्यांच्या अभ्यासामुळे आणि धडाडीमुळे जून 2016पासून कुलकर्णी यांच्याकडे दहशतवादविरोधी पथकाचे उपायुक्तपद देण्यात आले. या पदावरही त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे 2017मध्ये संपूर्ण वर्षभर ते हैती या देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे तेथील कामगिरीच्या जोरावरच त्यांना गेल्या वर्षी "इंटरपोल'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्याकडे "इंटरपोल'मध्ये दहशतवाद विभागाच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या ते सिंगापूर येथे कार्यरत असून, 2022 पर्यंत या पदावर राहणार होते. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र पोलिस दलात दाखल होताच रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.