उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
औरंगाबाद/काल पुण्यात एकनाथ शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान कात्रज येथे उदय सामंत यांच्याविरुद्ध शिवसैनिकांकडून गद्दार..गद्दार अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्याचे समोर आले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
“उदय सामंत यांच्या वाहनावर भ्याड हल्ला झाला आहे. त्यामुळे ही मर्दुमकी नाही. कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर, पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहे. आरोपींवर कारवाई करण्याचे काम पोलीस करत आहेत. गुन्हा घडल्यावर पोलिसांना सांगावे लागत नाही की तुम्ही गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर कोणी चिथावणी खोर भाषण करत असतील तर त्यावरही पोलीस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था पोलीस पाहण्याचे काम करत आहेत. मला राज्यात शांतता हवी आहे.”अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.