-पालम(प्रतिनिधी) तालुक्यात मागील काही दिवसापासून सतत चा पाऊस व दिनांक 17 ,18 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करावीत, शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी पालम तालुका भाजपाच्या वतीने तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे यांच्या नेतृत्वाखाली पालम तहसीलदार प्रतिभा गोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

पालम तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी विविध बँकांकडून पीक कर्ज घेतले तर काही शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडूनही कर्ज काढून शेतामध्ये पेरणी केली.

शेतात सोयाबीन कापूस तूर यांच्यासह विविध पिकाच्या संगोपनासाठी रासायनिक खत पिकावर रोग येऊ नये म्हणून विविध कीटकनाशकाची फवारणी केली आहे. शेतातील पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून हातात आलेले सोयाबीन पीक परतीच्या पावसामुळे काढणी पश्चात नुकसानीत सापडले आहे. त्यामुळे डॅमेज झाले आहे. तसेच कापसाचे बोंडाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

त्यासाठी पालम तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई पोटी मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले, तालुका सरचिटणीस भगवान करंजे, तालुका युवा अध्यक्ष नंदेश्वर बलोरे, पालम शहराध्यक्ष मधुकर रोकडे, तालुका उपाध्यक्ष सुरेश सोनटक्के, रुपेश शिनगारे, प्रल्हाद व्हंडाळे ,नगरसेवक लक्ष्मण रोकडे, सोपान कराळे, आनंता कराळे, आनंद साखला , गोपिराज शिंदे, माऊली घोरपडे, सुजित मालेवर,राघू भैया दुधाटे, भास्कर कराळे, जोशी पालम, राम गावंडे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.