गुहागर : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न हाेता की काय अशी शंका आज (बुधवार) सकाळच्या सुमारास उपस्थित झाली आहे. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांची नक्कल केली हाेती. यावेळी जाधव यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मेळाव्यात या टीकेला उत्तर देताना राणेंसह भाजपावर टीका केली होती.
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न कुणी केला आणि कशासाठी केला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञातांकडून आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीये.
दरम्यान आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजपा विरोधातील वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अचानक सुरक्षा व्यवस्था काढण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.