चिपळूण : शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अभियान अंतर्गत चिपळूण नगर पालिकेने प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी फटाक्यांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांसह नागरिकांना फटाक्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर हरित व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

चिपळूण नगर पालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक व थर्मोकोल मुक्तीची मोहीम हाती घेण्यात आली. त्याच प्रकारे प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला ई कचरा संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वर्षामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर पालिका हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नागरिक तसेच स्थानिक संस्था यांच्यामार्फत सुमारे २००० झाडांची लागवड करण्यात आली. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी नगर पालिकेने आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पर्यावरणपुरक गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर पूरक दिवाळी साजरी करण्याचे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.