खेड : मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी आणलेल्या 5 लाख 15 हजार 709 रुपयांच्या साहित्याची 7 कामगारांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा 7 जणांवर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड येथे शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत कशेडी बोगद्याचे व मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे. या कामासाठी कंपनीने लोखंडी सळ्या, चॅनल, पाईप असे साहित्य आणले होते. लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला असलेल्या कामगाराने, टेम्पो चालक, क्लिनर व इतर 4 जणांच्या साथीने टेम्पो मध्ये भरून चोरी केली. साहित्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच मॅनेजर परमेश्वर उबाळे यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

या तक्रारी त्यांनी म्हटले आहे की कंपनीचे एकूण 5 लाख 15 हजार 907 रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले आहे. यामध्ये 4 लाख 47 हजार 600 रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या, 3500 रुपये किमतीचे यु. जॅकचे 10 नग, 59 हजार 407 रुपये किमतीची 12 चॅनेल, 7 हजार रुपये किमतीची दोन जाळी, 600 रुपये किमतीचे पाईप, 500 रुपयांचे लोखंडी पाईप, असा एकूण 5 लाख 15 हजारांचे साहित्य चोरीस गेले. उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. श्रीनिवास मंडळ (41, गडचिरोली), विजय गेडाम (40, गडचिरोली), प्रकाश आटके (37, गडचिरोली), विलास बुरुमवार (28, गडचिरोली), श्रीकांत नेनाम (29, गडचिरोली, टेम्पो चालक), अरुण सिंग (क्लिनर, ठाणे, मुळ उत्तरप्रदेश), सूरज त्रिपाठी (26, ठाणे) अशी गुन्हा दखल करण्यात आलेल्या 7 जणांची नावे आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.