जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा बिबट्यांचा सहवास मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील वनक्षेत्र भागात बिबट्याचे दर्शन होण्याचे सत्र सुरूच आहे. या शिवाय दाभा शिवारात जनावरांवर हल्ला चढवून त्यांचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास भोगाव देवी-इटोली रस्त्यावरील डोंगरतळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या नागरिकाने बिबट्याने व्हीडीओ तयार केले. सदरील व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. व्हीडीओ पाहून परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील बिबटयाचा शोध घेऊन त्यास पिंज-यात बंदिस्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांतून जोर धरीत आहे. सोशल मीडियावर बिबटया दिसल्याचे व्हीडीओ वायरल झाल्यानंतर वनविभागाने काय कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी दूरध्वनी केला असता अधिका-यांचे भ्रमण ध्वनी नॉट रीचेबल असल्याचे आढळून आले. दरम्यान भोगाव देवी ते इटोली रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी वाहनात प्रवास करत असताना तीनवेळा बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना दिली. पण अधिकारी आणि कर्मचा-यांनी दखल न घेता बिबट्या दिसल्याचे पुरावे मागितले. परंतु रविवारी दि.१६-१०-२०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना डोंगरतळा परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. यावेळेस पुरावा म्हणून व्हीडीओ तयार केला. आता बघू वनविभाग काय कारवाई करते असे मत बालाजी सांगळे यांनी व्यक्त केले आहे.