सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत .यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

 

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन तसेच धरणे आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासना कडून शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल घेतली नाही त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी एकवटले असून त्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पारंपारिक वेष धारण करत नांगर खांद्यावर घेऊन मोर्चा काढला . जोर-जोरात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू हंगामामध्ये फळांना फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, दिलेल्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईत सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही एवढे भयंकर संकट बागायतदार शेतकऱ्यांवर आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रूपये मदत द्यावी. अशी मागणी केली होती. मात्र शासन स्तरावरून त्याची काहीच कार्यवाही झालेले नाही. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर गेले आठ महिने वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडून सुद्धा खावटी कर्जदारांना व दोन लाखावरील कर्जदारांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील सन २०१५ ते २०१९ मधील २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच २०१५ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत. तसेच दरवर्षी खरीप व रब्बी पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. आदी मागण्यासाठी प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही अद्याप पर्यंत कोणतीही मागणी पूर्ण केली नाही .याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी आज ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यानी मोर्चा काढला. तर आपल्या मागण्यांचे निवेदन आज जिल्हा प्रशासनास सादर केले आहे. यावेळी महादेव परब,श्यामसुंदर राय, सुरेश गवकर, अर्जुन नाईक,प्रभाकर सावंत,सुभाष भगत,अशोक सावंत,नारायण गावडे,यशवंत तेली,प्रमोद सावंत, अजित माळकर, आदिसह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.