विद्यमान संचालकांच्या सहकार वैभव पॅनलने एकतर्फी बाजी मारत राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर विजय मिळविला आहे. १३ पैकी ११ जागांवर या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. तर श्री रवळनाथ परिवर्तन पॅनलला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे निकालाकडे जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहेत. 

 

        जिल्ह्यातील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी हाय व्होल्टेज ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. २०८० पैकी १३३७ मतदारांनी मतदान केल्याने ६२.१९ टक्के एवढे मतदान झाले होत. १५ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आल्याने १३ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. २७ उमेदवार यासाठी रिंगणात होते. विद्यमान संचालकांचे सहकार वैभव पॅनल विरुद्ध श्री रवळनाथ परिवर्तन पॅनल यांच्यात ही थेट लढत झाली होती. सोमवारी याची मतमोजणी सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली.