भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली . यात ८ वर्षीय मुलाचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला . तर त्याचे आई - वडील गंभीररित्या जखमी झाली . अपघाताची ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली ( ता.बीड ) येथील घाटानजीक घडली . नंदकुमार जयराम पवार ( वय ८ ) असे मयत बालकाचे नाव आहे . तर जयराम भागवत पवार ( वय ५० ) व त्यांची पत्नी अर्चना जयराम पवार ( वय ४६ , दोघे रा . केज जि . बीड ) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत . सोमवारी सायंकाळी पवार दाम्पत्य त्यांच्या मुलासह दुचाकीवरून पाली येथील घाटातून जात होते . या दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली . यामध्ये नंदकुमार जयराम पवार हा जागीच मृत्यू पावला तर त्याचे आई - वडील गंभीर जखमी झाले . त्यांना उपचारासाठी तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु त्या दोन्हीही जखमीची परिस्थिती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी अर्चना पवार यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय तर जयराम पवार यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले .