बीड – "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने बीड पंचायत समितीमध्ये राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याहस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार सुहास हजारे, बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरूद्ध सानप आदि उपस्थित होते. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती बीड अंतर्गत सिमरन महिला स्वयंसहाय्यता गट, पेंडगाव यांनी विक्री केंद्र सुरू केले आहे.

            जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत देशभरात सुधारित वेळापत्रकानुसार

दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करावा. दिलेल्या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना तसेच सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज उभारावा. तसेच नागरिकांना त्यांच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरांवर उभारलेले राष्ट्रध्वज दररोज संध्याकाळी खाली उतरवायची गरज नाही. मात्र, ध्वजसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी जय तुळजाभवानी मसाले पापड उत्पादन गट, कुर्ला, तसेच विठाई महिला पापड उत्पादक गट, अंथरवणपिंप्री या  स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.