सीईओ अजित पवारांच्या उपस्थितीत केज पं.स. कार्यालयात आज बैठक, कार्यशाळा
सरपंच, कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे - बीडीओ राजेंद्र मोराळे
केज
दि.२ : येथील पंचायत समिती कार्यालयात आज (दि.३) सकाळी १० ते ६ या वेळेत सरपंच, ग्रामसेवक, कार्यालयीन कर्मचारी यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या बैठक व कार्यशाळेस सर्व सरपंच, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत अभिलेखे याविषयी पाटोद्याचे गटविकास अधिकारी सुमित जाधव हे सादरीकरण करतील. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे हे कार्यालयीन कार्यपद्धती, गेवराईचे गटविकास अधिकारी सचिन सानप हे पाणंद रस्ते कार्यवाही, यशदाचे मास्टर ट्रेनर श्री.इंगोले हे नरेगा कामकाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके हे थोडेसे मायबापासाठी व रेन वॉटर हार्वेस्टिंग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे हे घरकुल योजना, मुख्य लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे हे जीएसटी व शासकीय कपाती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे हे हरघर तिरंगा उपक्रम व सर्वात शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे नरेगा, वृक्षारोपण, पाणंद रस्ते, 'माझा गाव, सुंदर गाव, समृद्ध गाव' अभियान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून प्रत्येक अधिकारी हे एक तासाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी केले आहे.