रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायातींसाठी रविवारी उत्स्फूर्त मतदान झाले. शिरगाव ग्रामपंचायतीसाठी 57.01%, फणसोपसाठी 67.83% तर पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायती करीता सर्वाधिक 71.13% टक्के मतदान झाले.
तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यापैकी चरवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. तर प्रतिष्ठेची शिरगाव आणि फणसोप मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध युती आणि पोमेंडी बुद्रुक येथे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट विरूध्द भाजप असा सामना रंगला. प्रचाराच्या कालावधीत सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. प्रतिष्ठेच्या शिरगाव ग्रामपंचायतीवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले होते. या ठिकाणी तिरंगी लढत असल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे.
रविवारी तिन्ही ग्रामपंचायतीकरीता अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. शिरगाव आणि फणसोप ग्रामपंचायतीत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिरगाव ग्रामपंचायतीसाठी 57.01%, फणसोपसाठी 67.83% तर पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायती करीता सर्वाधिक 71.13% टक्के मतदान झाले. सायंकाळ नंतर मतदानाचा जोर कायम होता. सोमवारी सकाळी दहा वाजता सामाजिक भवन, कुवारबाव रत्नागिरी येथे मतमोजणी होणार असून तीन ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.