रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातून रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल ड़ी बिले यांनी माजी खासदार नीलेश राणेंसह 16 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
वृत्त असे की, 10 एप्रिल 2019 रोजी रत्नागिरीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातखंबा येथे पोलिसांच्या पथकाकडून गाड्यांची तपासणी सुरू होती. रात्री 12 च्या सुमारास नीलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीने हातखंबा येथे आले असता पोलिसांनी राणे यांची गाडी तपासणीसाठी अडवली. गाडी अडवताच संतप्त झालेले निलेश राणे व कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तसेच शिवीगाळ केली. यावेळी पोलीस आणि राणे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याचवेळी शिवसेना उपजिल्हापमुख बाबू म्हाप त्या ठिकाणी आले. बाबू म्हाप यांना पाहताच राणे व त्यांच्या समर्थकांनी बाबू म्हाप यांनाही शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून गेले. या प्रकरणी उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी नीलेश राणे व त्यांच्या 16 साथीदारांवर भादंवि कलम 352, 143, 145, 149, 151, 186, 294, 153 504, 506 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केला. त्यानंतर 16 संशयितांविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले.
हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालवण्यात आला मात्र पोलिसांकडून 353 हे कलम लावण्यात आल्याने हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या खटल्याचा निकाल देत सर्व 16 संशयितांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड. सचिन थरवळ यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल डी बिले यांनी या खटल्याचा निकाल देत 16 जणांची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष सुटलेल्यांची नावे
नीलेश नारायण राणे (रा. कणकवली), तुषारकुमार जयवंतभाई पांचाळ (रा. मुंबई), गौरांग प्रवीण खानविलकर ( मुंबई), मयुर सतीश रावणाक ( रा. मुंबई), श्वेतांग प्रदीप वायंगणकर (रा. रत्नागिरी), सिद्धेश हेमंत नेरकर (रा. रत्नागिरी), येगेश दत्ताराम मांजरेकर (रा. रत्नागिरी), संदेश पांडुरंग आरोदेकर (रा. गोवा), सिद्धेश चंद्रशेखर मालवणकर (रा. कुडाळ), चिनार राजन मलुष्टे ( रा. रत्नागिरी), अभिलाष जयप्रकाश कारेकर (रा. रत्नागिरी), गिरीष प्रवीण ओझा (रा. मुंबई), नंदकिशोर विश्वनाथ चव्हाण (रा. रत्नागिरी), पराग पर्शुराम पाटील (रा. रत्नागिरी), सुभाष नारायण पवार (रा. रत्नागिरी), शुभम प्रीतम जोशी (रा रत्नागिरी) यांचा समावेश आहे.