रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इ. 5 ते इ. 7 वीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, यासाठी भारतातील 'इस्त्रो' आणि अमेरिकेतील 'नासा' या दोन वैज्ञानिक संस्थांची सफर घडवण्यात येणार आहे. त्यामध्ये 'इस्त्रो' या सफरीसाठी 27 तर 'नासा' या सफरीसाठी 9 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा घडवून हा निर्णय घेण्यात आला आहे. विज्ञान तसेच संशोधन अभ्यासाची आवड असणाऱ्या निवडक विद्यार्थी 'इस्त्रो' व ‘नासा’ या संस्थांना भेटी घडवून आणण्याचा हा महत्वपूर्ण उपक्रम जिल्हास्तरावर प्रथमच हाती घेण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ निर्मितीत पाया रोवणे हा उद्देश आहे. त्यातून अंतराळ संशोधनाबाबत विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना त्यातून ओळख निर्माण होणार आहे. या दोन्ही वैज्ञानिक संस्थांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करणेही सोयीचे जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीचा विकास होईलच पण त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अभूतपूर्व अनुभव घेता येणार आहे.