रत्नागिरी: अंधेरी मतदार संघात २०१९ मध्ये भाजपने अपक्ष उमेदवार उभा केला होता. त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती हे आता समोर आले आहे, असा थेट निशाणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला.
जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी खासदार तटकरे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर होत असताना महाविकास आघाडीचे गठन करण्यात आले. आता राज्यात सत्तांतर झाले असले तरी महाविकास आघाडी अजूनही अस्तित्वात आहे. भविष्यात राजकीय परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सोबत राहावे, असा प्रवाह वरिष्ठ पातळीवरती आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून, पुढेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा विचार वरिष्ठ नेते करतील, असे ते म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अशीच लढत झाली आहे. भाजपने अपक्ष उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उभे केले होते. त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती. हे आता अनुभवायला मिळाले आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी होतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
ऋतुजा लटके यांनी एक महिना आधी राजीनामा दिला होता. त्यांचे एक महिन्याचे वेतन कोषागार कार्यालयातून जमा झाले होते. मात्र, त्यांचा निवडणूक लढविण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने महानगरपालिकेच्या कृतीला चपराक दिली आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देण्याच्या घटना घडत आहेत. वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे, प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जात असतो. जनता त्याबाबत योग्य तो निर्णय घेत असते. पण निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुद्दाम बाजूला करून निवडणूक लढता येऊ नये असे कृत्य शासन मान्य यंत्रणेच्या माध्यमातून करणे चुकीचे असल्याचे खासदार तटकरे म्हणाले.