रत्नागिरी : 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसणार असून या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना या निर्णयामुळे सर्वाधिक फटका हा कोकणातील मराठी शाळांना बसणार असून दुर्गम भागात ,वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते. शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थी हित लक्षात घ्यावे अशी भूमिका घेऊन या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.दि.20 ऑक्टोबर 2022 सकाळी 10 ते दुपारी 2 वा. या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी येथे हे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले यांनी दिली आहे.