राजापूर : तालुक्यातील बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांची भेट घेतली. चांगले पर्यावरण पूरक प्रकल्प आणले तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे स्पष्ट करताना रिफायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. सिंग यांच्या भेटीच्यावेळी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नरेंद्र जोशी, कमलाकर गुरव, सतीश बाणे, सत्यजीत चव्हाण, नितीन जठार, प्रशांत घाणेकर, रमाकांत मुळम आदी पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीच्यावेळी रिफायनरी विरोधाची कारणे, आतापर्यंतचा संविधानिक मार्गाने देण्यात आलेला लढा आदींसंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली. आंदोलक ग्रामस्थ व संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्याबद्दल व ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी नसताना सुरू असलेल्या बेकायदेशीर सर्वेक्षणाबद्दल कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रिफायनरी रद्द होईपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू राहील असेही स्पष्ट करण्यात आले.
रिफायनरी प्रकल्प रद्द करा ; बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_6e2b28c083530326a9b8f1da03f9d50e.jpg)