गुहागर : तालुक्यातील खेड खाडीपट्टा विभागात बहिरवली मुस्लिम मोहल्ला क्रमांक २ येथे जाण्यासाठी रास्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची दळणवळणाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत आहे. या मोहल्ल्यात जाणाऱ्या २०० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

वंचित आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव आणि महासचिव नितीन उर्फ दादा जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून या पत्रात बहिरवली मोहल्ला क्रमांक दोनवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांची कशी गैरसोय होत आहे हे पत्रात नमूद केले आहे. बहिरवली मोहल्ला क्रमांक २ येथे जाण्यासाठी असलेला मार्ग हा कच्चा रस्ता असल्याने येथील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांची दळणवळणाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत आहे. रात्री अपरात्री आजारी पडलेल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयायत न्यायचे असल्यास मुख्य रस्त्यापर्यंत चालत यावे लागते. अशी अवस्था या भागात आहे. त्यामुळेच बहिरवली मोहल्ला क्रमांक येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या २०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.