सोलापुर :- अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे काल दुपारी पावणे चारच्या सुमारास वीज पडून पाच जण जखमी झाल्याची घटना शेतामध्ये घडली आहे.त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.यात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शिवाजी पंढरी शिंदे ,सुमित गुरप्पा कलशेट्टी ,गुरप्पा सुभाष कलशेट्टी, संभाजी शिवाजी मोरे , अंबिका गुरप्पा कलशेट्ट अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली.
ते बादोला रोडकडे असलेल्या शेतीमध्ये काम करत होते.यानंतर पावसाला सुरुवात होताच एका कढईच्या खाली ते पाच जण दबून
बसले होते.यावेळी अचानक साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीज कडाडली आणि ती वीज अंगावर पडून पाच जण जखमी
झाले.याची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळताच तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलवून अक्कलकोटला हॉस्पिटलमध्ये
दाखल केले.ही घटना समजताच तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी ग्रामसेवक तसेच तलाठी चोरमुले यांना घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सरपंच व्यंकट मोरे,चुंगी सरपंच राज चव्हाण,तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे यांच्यासह अनेकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली.या घटनेबाबत प्रशासनाकडूनही योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.