रत्नागिरी : निवळी जयगड रोडवर रोज मोठया प्रमाणात ओव्हरलोड वाहनांमार्फत वाहतूक होत असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्डयांचे साम्राज्य पसरले असून त्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. या रस्त्यावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. याबाबतीत वारंवार संबंधित यंत्रणेला सांगून ही दुर्लक्ष केले जात आहे.
तसेच शाळेच्या वेळेत तरी किमान वाहतूक बंद ठेवावी, अशी ही मागणी वारंवार करण्यात आली याकडे ही दुर्लक्ष केले जात असल्याने आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ओव्हरलोड होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी असे निवेदन देण्यात आले.
तसेच 20 ऑक्टोबर पूर्वी ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद न केल्यास रस्त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा भारतीय जनता पार्टीच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस श्री. ओंकार फडके, तालुका ऊपाध्यक्ष श्री.संकेत कदम , नंदू बेंद्रे, नंदकिशोर चव्हाण उपस्थित होते.