रत्नागिरी : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांच्या मदतीसाठी, त्यांच्यावर उपचारांच्या सहकार्यासाठी दत्तकत्व घेण्यास आता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह, कर्मचारी पुढे आले आहेत. जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दत्तकत्व स्विकारले आहे.
रूग्णांना सकस आहार मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेंतर्गत शासकीय किंवा खाजगी रूग्णालयांमध्ये क्षयरोगावर औषधोपचार घेणाऱ्या रूग्णास प्रति महिना 500 रूपये पोषण आहार भत्ता दिला जातो. याची रक्कम संबधित रूग्णाच्या बँक खात्यावर जमा केली जाते. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय टी. बी. फोरम सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी देखील सर्व खाजगी औदयोगिक संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना जास्तीत जास्त निक्षय मित्र होण्यासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) डॉ. वसिम सय्यद, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जि.प. रत्नागिरी- डॉ. आर. बी. शेळके, अवैद्यकिय सहाय्यक कुष्ठरोग कार्यालय रत्नागिरीचे संतोष गुट्टे, विस्तार अधिकारी (आरोग्य) तालुका आरोग्य कार्यालयाचे के. एन. बिराजदार, तालुका आरोग्य कार्यालय रत्नागिरी तुषार साळवी, सुहास गुरव, आरोग्य सहाय्यक जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी एस. आर. तुपे यांनी रत्नागिरी तालुक्यातील काही क्षयरुग्ण दत्तक घेतले आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत रुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत पोषक आहार पुरविला जाणार आहे.