रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे पिंपळवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केल्याने चिमुकली जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कुत्र्याने या चिमुकलीच्या डोक्याला आणि पायाला चावा घेतल्याने जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिच्यावर उपचार करुन तिला घरी सोडण्यात आले. मात्र पिसाळलेल्या कुत्र्याच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाचणे पिंपळवाडी येथे एक 7-8 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेल्या चिमुकलीने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. तोपर्यंत कुत्र्याने तिच्या डोक्याला आणि पायाला चावा घेतला होता. जमलेल्या लोकांनी कुत्र्याला पिटाळून लावले. त्यानंतर मुलीला औषधोपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करुन रात्री तिला घरी सोडण्यात आले. मात्र कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत तसेच रस्त्यावर खेळण्यासाठी मुलांना बाहेर पाठवण्यास पालक घाबरत आहेत.
रत्नागिरीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अनेक भटकी कुत्री रस्त्यांवर फिरताना तसेच वाहन चालक आणि मुलांच्या अंगावर हल्ला करतात. वाहन चालकांचा पाठलाग करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने यापूर्वी कुत्र्यांच्या नसबंदीची मोहिम हाती घेतली होती. मात्र काही दिवसानंतर ही मोहिमच बारगळली. आता पुन्हा कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रत्नागिरीतील नागरिक उनाड गुरे आणि भटक्या कुत्र्यांना वैतागली असून नगर परिषदेने वेळीच अशा कुत्र्यांवर आणि गुरांची धरपकड मोहिम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.