दापोली: बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या,स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरीत प्राधान्य द्या,या मागणीसाठी बिरसा फायटर्स जिल्हा रत्नागिरी व आदिम आदिवासी कातकरी संघटना जिल्हा रत्नागिरी या 2 संघटनांनी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दापोलीत आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन केले.

               

बोगस आदिवासींवर कारवाई झालीच पाहिजे,बोगस हटाव आदिवासी बचाव, स्थानिक आदिवासींना नोकरी मिळालीच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय,आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा,आवाज कुणांचा आदिवासींचा अशा घोषणा देत आझाद मैदान दापोली पासून मोर्च्याला सुरुवात झाली.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पोलीस ठाण्यात मोर्चा नेण्यात आला.पोलीस निरीक्षक दापोली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर गाळीतळ मार्गे दापोली बाजारातून मोर्चा पंचायत समिती दापोलीत आणण्यात आला.पंचायत समिती आवारात जोरदार घोषणाबाजी मोर्चेकर्त्यांनी केल्या.गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनाही निवेदन देण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दापोली कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.प्रांताधिकारी यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.नंतर पोस्ट ऑफिस गल्ली मार्गे तहसिल कार्यालय दापोलीत मोर्चा आला. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी मागण्या समजून घेतल्या व तुमच्या मागण्या शासनदरबारी वरिष्ठांपर्यंत पोहचवते,असे आश्वासन दिले.

             

नगरपंचायत दापोली मार्गे बुरोंडी नाक्यावरून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय गेटसमोर मोर्चा नेण्यात आला.तेथे आदिवासी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.ठिय्या आंदोलन सुरू होताच कोकण कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व कुलसचिव आंदोलन स्थळी आले. विद्यापिठाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ,कुलसचिव व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने आंदोलन थांबवण्याची विनंती केली,परंतु आंदोलनकर्ता महिला आदिवासींनी अधिकाऱ्यांना दम भरला.आता आम्ही रस्त्यावरून व गेटवरून परत जातोय,मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालयातच घूसू, मग आम्हाला काही झाले तरी चालेल, आम्ही आमचा जीव द्यायला सुद्धा तयार आहोत. 

                

 कोकण कृषी विद्यापीठ स्थापन होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही आदिवासी उमेदवाराला विद्यापीठात नोकरीला लावण्यात आले नाही,ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.नोकर भरती प्रक्रियेची साधी जाहीरात सुद्धा आमच्या आदिवासी उमेदवारांपर्यंत पोहचत नाही.विद्यापीठात पैसे देऊन नोकर भरती केली जाते,आदिवासींच्या जागेवर बोगस आदिवासींना व अन्य उमेदवारांना नोकरीवर घेण्यात येते,असा आरोप सुशिलकुमार पावरा यांनी आंदोलनात बोलताना केला.

                   

 कोकण कृषी विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरी भरतीत प्राधान्य द्या,नोकरीवर घ्या.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊ नका,त्यांची सेवा समाप्त करा.खोट्या जात प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांवर व अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन अटक करा.आदिवासींची विशेष पदभरती मोहीम राबवा.दापोलीत आदिवासी समाज भवन बांधण्यात यावे.हुतात्मा नाग्या कातकरींचा पुतळा उभारण्यात यावा.या मागण्याही करण्यात आल्या.

             

सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चात बिरसा फायटर्सचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत निकम,कार्याध्यक्ष संदिप पवार,राज्य महिला प्रतिनीधी चंद्रभागा पवार, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश पवार ,सचिव अक्षय निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे चंद्रकांत जाधव ,दापोली तालुकाध्यक्ष विठोबा जगताप, सचिव महेश वाघमारे ,सल्लागार कृष्णा हिलम, आशा जाधव,राजू निकम,शंकर पवार, नागेश हिलम,मोहन हिलम, सरपंच सविता निकम,

अजय निकम,त्रृतिक निकम,रमेश निकम, बळीराम पवार, अनंत पवार, राजेश पवार, निलेश पवार, सुभाष निकम,सचिन निकम,वनिता पवार मंदा निकम,सनवी पवार, अल्का निकम,छाया पवार आदि हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या.या मोर्चात बेरोजगार आदिवासी तरुण व तरुणींची संख्या अधिक होती.