गुहागर : पोलीस असल्याचे भासवत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिस असल्याचे भासवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा उमेश शिगवण (२६, रा. निगुंडळ) याचा डाव फसला. यातील मुलीने हुशारी दाखवत त्याचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि. ४) दुपारी मित्रासोबत फिरायला आली होती. यावेळी उमेश शिगवणने तिला हेरले. पोलिस असल्याची बतावणी केली. 'तू माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल' असे सांगत उमेश तिला पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन आला. तिथे आल्यावर गुहागरचे पोलिस कडक आहेत, ते तुला तुरुंगात टाकतील. त्यापेक्षा आपण श्रृंगारतळीच्या पोलिस ठाण्यात जाऊया, तिथले पोलिस चौकशी करून तुला घरी सोडतील, असे उमेशने मुलीला सांगितले आणि तिला रिक्षात बसवून शृंगारतळीकडे रवाना झाला.
पाटपन्हाळे कॉलेजजवळ आल्यावर उमेशने रिक्षा सोडून दिली. मुलीला सांगितले की, आता माझी ड्युटी संपत आहे. पुढची ड्युटी करणारा पोलिस इथे रहातो. त्याच्याकडे आपण जावू. त्यानंतर तुला आम्ही सोडून देवू. असे सांगून पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील निर्जन जंगल भागात उमेश तिला घेऊन गेला. तिथे गेल्यावर तुला सोडण्यासाठी तु मला काय देशील, असे विचारत उमेशने मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आपल्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे हे लक्षात आल्यावर मुलीने तिथून पळ काढला आणि ती गुहागर शृंगारतळी या रहदारीच्या रस्त्यावर आली. या नंतर उमेशने तेथून पळ काढला. ही मुलगी घरी उशिरा पोहोचली म्हणून पालकांनी चौकशी केली. त्यावेळी आपल्याला एक पोलिसाने पकडले व तो पोलिस ठाण्यात घेवून जात होता, असे मुलीने सांगितले तसेच उमेशचा मोबाईल क्रमांकही दिला. मग पालकांनी गुहागर पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती घेतली.