रत्नागिरी : रत्नागिरीच्या आकाश प्रमोद पालकर याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. आकाशने काही महिन्यांपूर्वी हिमालय प्रदेशातील लाहौल भागात असलेले माऊंट युनाम हे ६,१११ मीटर म्हणजेच २०,१०० फूट उंचीवर असणारे शिखर यशस्वी चढाई करून पूर्ण केले होते. या शिखरावर यशस्वी चढाई करत राष्ट्रध्वज फडकावून आकाशने रत्नागिरीकरांसह देशाची मान उंचावली आहे.
त्यानंतर आता त्याने गिर्यारोहणाचे एक महिन्याचे साहसी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आकाशने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स ( NEMAS) या संस्थेच्या माध्यमातून एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन आकाश रत्नागिरीत परतला आहे. या प्रशिक्षणामध्ये त्याने स्पोर्ट्स क्लाइंबिंग भिंत, कृत्रिम जागांचा अतिरेक, गिर्यारोहण प्रशिक्षण आणि चाचणी याचबरोबर धावणे, नकाशा रेडिंग चाचणी पर्वतारोहण व्याख्यान, प्रशिक्षणाच्या शेवटच्या भागात लोड फेरी ट्रेकिंग पाठीवर 25 ते 30 किलोची बॅग घेवून 8 किलोमीटर धावणे, अशा वेगवेगळया पद्धतीने ट्रेनिंग पूर्ण केले, असे त्याने सांगितले.
आकाशने पुढे सांगितले की, या क्षेत्रात आवड असणाऱ्या मुलांना माऊंटेनिअर्स असोसिएशन रत्नागिरी या संस्थेच्या मार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच रत्नागिरीतील मुलांना चांगल्या प्रकारे गिर्यारोहण प्रशिक्षण, क्रीडा गिर्यारोहण यासाठी तयार करण्याचा असोसिएशनचा उद्देश आहे, असे तो म्हणाला.