आदिवासी वाडी वरील गर्भवती महिलेस दिड किमी उचलून चालत आणत उपकेंद्रामध्ये केली सुरक्षित प्रसूती
आशा सेविका जान्हवी मोडसिंग व रुची मोरे होतेय कौतुक
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदगाव उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या आशा सेविका जान्हवी चंद्रकांत मोडसिंग व रुची राम मोरे या दोघींनी आदगाव पाष्टेवाडी जवळ म्हणजेच उपकेंद्रापासून सुमारे दीड किलोमीटर दूर आलेल्या डोंगरभागातून सुनीता वाघमारे या गर्भवती महिलेस प्रसव वेदना होत असताना तिला दोघींनी उचलून उपकेंद्रामध्ये आणित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका मार्फत सुरक्षित प्रसूती केल्याबद्दल तसेच त्या दोन्ही आशा सेविकांचे तालुक्यामध्ये कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहितीनुसार आदगाव गावाजवळ असणाऱ्या डोंगरभागामध्ये पाष्टेवाडी जवळ एका आंबा बागायतीमध्ये असणाऱ्या झोपडी मध्ये गर्भवती सुनीता दिपक वाघमारे आपल्या नवरा, एक मुलगा व आई यांच्या समवेत रहात आहे. हे कुटुंब ज्या भागात रहातात ते ठिकाण आदगाव उपकेंद्रा पासून दीड किलोमीटर दूर आहे व तेथून चालतच येण्याशिवाय पर्याय नाही, पावसामुळे भातशेती असल्याने तिथे साधी दुचाकी सुद्धा जावू शकत नाही किंवा मोबाईल चे नेटवर्क देखील नाही ही शोकांतिका आहे. या गर्भवती महिलेस 9वा महिना सुरू होता महिलेची नाव नोंदणी आदगाव उपकेंद्रामध्ये करण्यात आली होती , प्रत्येक महिन्यात या महिलेची आशा सेविका जान्हवी मोडसिंग करीत होत्या यातच दोन दिवसांपूर्वी आशा सेविका जान्हवी मोडसिंग व परिचारिका अश्विनी ठाकूर पाटील या गर्भवती महिलेस घरी जाऊन तपासणी करून आल्या व त्यावेळी तिला रक्त वाढीच्या गोळ्या देऊन आल्या, आज सोमवारी पुन्हा तिची विचारपूस करण्यासाठी आशसेविका जान्हवी मोडसिंग व रूपा मोरे दोघी त्या ठिकाणी गेल्या त्यावेळीस त्या गर्भवती सुनीता वाघमारेस प्रसव वेदना सुरू झाल्याचे त्यांना समजले त्या दोघींनी त्या महिलेच्या पतीच्या मदतीने कोणताही विचार न करता जिद्दीने त्या गर्भवती महिलेस उचलून घेतले व चालत उपकेंद्राचा रस्ता धरला, शेतीच्या बांधावरून उचलून आणताना तारेवरची कसरत करीत 45 मिनिटांमध्ये उपकेंद्र गाठले व त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी श्री डाॅ. सुरज तडवी, परिचारिका सुजाता धनावडे, आश्विनी पाटील ठाकुर त्याचप्रमाणे परिचर ,ज्योती मोरे आणि शिपाई उल्का मोरे ,श्रीमती छाया विलणकर यांनी त्या महिलेची सुरक्षित प्रसूती केली.
ग्रामीण व डोंगराळ भागामध्ये कोरोना काळात देखील अशासेविकांची कामगिरी मोलाची होतीच यातच ज्या भागात मोबाईल नेटवर्क नाही, दुचाकी जाण्यासाठी रस्ता नाही अशा खडतर भागातून या महिलेची उपकेंद्रामध्ये स्वतः उचलून आणित प्रसूती करवून घेतली ह्या आशा सेविकांचे कौतुक तालुक्यामध्ये होत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनानेच नव्हे तर महाराष्ट्र व केंद्र शासनाने या कार्याची दखल घ्यावी हिच मागणी ग्रामीण भागातून होत आहे.