चिपळूण : डेरवण येथीलएस. व्ही. जे. सी.टी.स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे दि. १३ ते १६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व डेरवण क्रीडा संकुल यांच्या सहकार्याने सातवी सबज्युनियर डॉजबॉल मुले व मुली अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होत आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातून २२ राज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यामध्ये गोवा, बिहार, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, चेन्नई, मुंबई, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, मध्यभारत, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि यजमान महाराष्ट्र या संघांचा समावेश सहभाग आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन १४ ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता आ. शेखर निकम, आ. योगेश कदम यांच्या हस्ते तसेच माजी जि. प. सदस्य ऋतुजा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव पी. एस. ब्रार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण तालुका काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, टीडब्ल्यूजेचे स्वप्निल नार्वेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील खेळाडू महाराष्ट्राच्या संघात
या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघातून खंडाळा इंग्लिश मीडियम खंडाळा या शाळेचा ऋतुराज राजेश जाधव हा खेळाडू तर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज अंबवली या विद्यालयाचा अथर्व मिलिंद शिंदे हे दोन खेळाडू तर मुलींच्या संघातून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड या शाळेची केतकी संतोष शिर्के यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पंच गणेश सावर्डेकर यांची या स्पर्धेसाठी पंच पॅनलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.