रत्नागिरी : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. आपले आरोग्य उत्तम ठेऊन आपल्या कुटुंबांचे रक्षण केले पाहिजे आणि यासाठी प्रौढ आणि ज्येष्ठांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे तसेच प्रत्येकाने आपल्या घरी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे तंबाखूच्या दुष्परिणामांबाबतची जनजागृत्ती करावी असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयत, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. शैलेश गावंडे,डॉ. गौरव विधळे,एम.डी.एस. मुख विकृती शास्त्र, समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
विविध प्रकारचे हृदयरोग, फुप्फुसाचे आजार, कर्करोग हे देखील तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत, त्यामुळे सर्वांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी यावेळी दिला. तंबाखूजन्य पदार्थांचे मोठी दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. कॅन्सर साऱखे गंभीर आजार होतात. त्यामुळे तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी मुलांना उपक्रमात घेतले. त्यांच्या आणि शिक्षकांमार्फत जनजागृती मोहित हाती घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. गौरव विधळे यांनी आलेल्या रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करुन व्यसन सोडविण्याकरिता औषध देऊन रुग्णांचे समुपदेशन केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानिमित्त जिल्हा स्तरीय संशय़ित मौखिक कर्करोग तपासणी मोहिम, जिल्हा स्तरीय राष्ट्रीय तंबाखू मुक्त शाळा आणि चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. विविध स्पर्धेमध्ये बक्षिस मिळविलेल्या मुलांचा यावेळी सत्कार करून त्यांना स्कुल बॅग बक्षिस देण्यात आली.