रत्नागिरी : खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर नगर पालिकांच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे मत जाणून घेतले जात आहे. रत्नागिरीमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी करून निवडणूक लढवण्याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. शिंदे गट व भाजपाची सत्ता आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणामुळे नागरिकांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक बबनराव कनावजे यांनी व्यक्त केले.

आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत रत्नागिरीतील शहर व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बबनराव कनावजे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, सुदेश मयेकर, बशीर मुर्तुझा, निलेश भोसले, अभिजित हेगशेट्ये, राजन सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जागा वाटपाबाबत तीनही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी महिनाभरात बैठक घेऊन निर्णय घेतील, असे सांगितले. कोकणचे नेते खा. सुनील तटकरे लवकरच रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल व जागा वाटपाबाबत निर्णय होईल, असे कनावजे म्हणाले.